Sixth

|| आदर्शवान दिव्यदर्शन  ||

महाराजांनी संत श्री गोस्वामी तुलसीदासजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने रचलेले काव्य



आश्रमी जीवन । न जन न वन । स्वानंद दर्शन । आदर्शवान ।। १ ।।
इंद्राच्या बागेंत । वा गावाच्या घाणीत । फुल ते प्रफुल्लित । आदर्शवान ।। २ ।।

दर्श 30 अंधारात । चन्द्र सूर्य झाले लुप्त । पण तारे आकाशात । आदर्शवान ।। ३ ।।
ग्रीष्मांत रसा दग्धली । देवकी सातदां कण्हली । वर्षांत वृष्टि जाहली । आदर्शवान ।। ४ ।।

ही वसुधा हिरवीगार । गोकुळी कृष्ण अवतार । सौंदर्यं अपरंपार । आदर्शवान ।। ५ ।।
नवसत न वसत । गवसत ग वसत । विरहांत रहात हात । आदर्शवान ।। ६ ।।

चित् ब्रह्म स्वयं जागले । परब्रह्म सगुणी आले । सच्चिदानंद नटले । आदर्शवान ।। ७ ।।
सामथ्र्य, ज्ञान, पावित्र्य । नि प्रेम दिव्य चारित्र्य । चित् चोर ध्वनी वेणूंत । आदर्शवान ।। ८ ।।

गो महिषीं आनंदल्या । माथनीं दुधानें भरल्या । तरि क्षणीक वृत्ती शमल्या । आदर्शवान ।। ९ ।।
वरुणानें केला कहर । इंद्राच्या जयजयकार । दिव्यत्त्व करी परिहार । आदर्शवान ।। १० ।।

अशी दमन नीती नसती । तर बुध्दि अनात्मिं कलती । हा बोध देव जगजेठी । आदर्शवान ।। ११ ।।
जे न्याय नितिनें जगले । जरी लोणी तयांचे लुटलें । जंव वसंत ह्नदयीं फुलें । आदर्शवान ।। १२ ।।

एकाचा दिव्यानंद । गोकुळांत चिदानंद । आश्रमांत सेवानंद । आदर्शवान ।। १३ ।।
तें लाभाया नवनीत । आश्रमीं प्रार्थना नीत । जंव प्रसन्न सद्गुरूनाथ । आदर्शवान ।। १४ ।।

गोस्वामी तुलसी जयंती । गुरूवार मंगल तिथी । रविचतुर्थ पुष्येऽर्कीं । आदर्शवान ।। १५ ।।
श्रावणीं शुक्ल सप्तमी । बलीवर्द दमन्त मर्मीं । ह्नत्कमल आत्मारामीं । आदर्शवान ।। १६ ।।

देहाचे भान ना उरतें । जीवाचें पारणे फिटते । बोलती वाणी मौनतें । आदर्शवान ।। १७ ।।
हा भाव-गंगेचा बिंदु । आलिंगत करूणा सिंधु । चिदाकाशी दिव्यानंदु । आदर्शवान ।। १८ ।।

अज्ञान, तिमिर लोपलें । संयमी ब्रह्म जागलें । ज्ञान प्रकाशी रमले । आदर्शवान ।। १९ ।।
ना अनल ना दग्धता । त्रय ताप निमाला आतां । कृपा वृष्टि आश्रमी होता । आदर्शवान ।। २० ।।

हे दिव्यगुणीं माहेर । जीवाचे सदा चित् चोर । राधेस मूलाधार । दिव्यदर्शन ।। २१ ।।
मधुवंती माधुरि झरली । रसरसात रसरसली । गोकुळभर गुंजली । दिव्यदर्शन ।। २२ ।।

अनहद् ध्वनी तव स्फुरलें। मुरलीचें माध्यम धरलें। दश मकार पण स्थिरले। दिव्यदर्शन।।२३।।
विश्वाचे कुंजवन झाले। भू-जल नभ-चर मुग्धलें। चिद् विलास रूप नटले। दिव्यदर्शन।।२४।।

त्या गोप गोपिका साक्षी। मरघटीं माधव रक्षी। गोरसांत सार जें लक्ष्यी। दिव्यदर्शन।।२५।।
सच्चिदानंदघन विलनीं।जीवाचे रान करूनी। रानाचे जीवं स्मशानीं। दिव्यदर्शन।।२६।।

देवाच्या मागें जीव । जीवाच्या मागें देव । उभयांचा सहज स्वभाव । दिव्यदर्शन ।।२७।।
ते देवलोक मोहिले। जंव स्वर्गीय संगीत चाले। तरी भाज्यास भागता उरले।दिव्यदर्शन।।२८।।

हे ज्ञान जणू भाजक। नि दर्शलीला भाज्यांत। भागतां उरलें शेष। दिव्यदर्शन।।२९।।
सती दक्ष पति सेवेत। स्थितप्रज्ञ लीन आत्म्यांत। नि शेष भार वाहत। दिव्यदर्शन।।३०।।

त्रि-भुवन अवघे डोले। दिव्यत्रय पण सुटलें। ध्येयनिष्ठ राहिले। दिव्यदर्शन।।३१।।
यावरती दिव्यत्त्व। तेंच खरें साक्षित्त्व। आध्यात्माचे महत्त्व। दिव्यदर्शन।। ३२।।


टीप:

ओ.क्र. ४ :-रसा-पृथ्वी देवकी सातदां कण्हली प्रसवली वर्षांत वर्षा ऋतु

ओ.क्र. ६ :-१) नवसत ‘न’ वसत-नवसाने झालेले फार काळ टिकत नाही
२) गवसत ‘ग’ वसत सापडलेल्यांना अहंकार



ओ.क्र. ११ :-अशी ही दमन-नीति नसती
दमननीति-दुष्ट नीति

ओ.क्र. १५ :-रवि चतुर्थ पुष्येऽर्कीं
पुष्य नक्षत्रांत सूर्य



ओ.क्र. १६ :- १) ‘बलीवर्द’ खरा अर्थ ‘रेडा’
परंतु याठिकाणी मूळावरचा ‘अहंकार’
२) मर्मी-हृदयांत

ओ.क्र. २३ :- १) ‘दहा-मकार’
१) मन २) मदन ३) मेघ ४) मर्कट ५) मद्य
६) मधुकर ७) मत्स्य ८) मानिनी ९) मरूत १०) मृग

२) अनहद्-ध्वनी
चैतन्यांतून स्फुरलेला आवाज (कुठल्याही माध्यमा शिवाय)



ओ.क्र. २५  :-मरघटीं-स्मशानीं

ओ.क्र. २८ :- ‘भाज्यास भागतां उरले’ तुरीय ब्रह्म



ओ.क्र. २९  :-१) हे ज्ञान-अध्यात्मज्ञान
२) दर्शलीला-श्रीकृष्णाने केलेल्या दिव्यलीला

ओ.क्र. ३१ :- ‘दिव्यत्रय’ पण सुटले दिव्यत्रय
१) सती
२) स्थितप्रज्ञ
३) शेष









।।जय सच्चिदानंद।।